तिरंगा लाल किल्ल्यावरच का फडकवला जातो?
स्वातंत्र्य मिळाल्यापासून स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला जातो. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान देशाच्या नावाने संबोधित करत असतात. मात्र, स्वातंत्र्याच्या सोहळ्यासाठी लाल किल्ल्याची निवड का करण्यात आली? हा साधा प्रश्न अनेकदा प्रत्येकाच्या मनात घर करत असणार. याचे कोणतेही नेमके कारण किंवा लिखित दस्तऐवज नाही. परंतु असे अनेक कारणे आहेत. ज्यामुळे लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याची परंपरा सुरू झाली. देशाच्या स्वातंत्र्याच्या उत्सवाचे केंद्रस्थान लाल किल्ला कसा बनला ते जाणून घेऊया...
![]() |
Photo Credit : Wallpaper Safari |
पाचवा मुघल बादशहा शाहजहांने बांधला
लाल किल्ला १६३८ ते १६४९ या काळात मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता. दिल्लीस्थित लाल किल्ला केवळ भारतीय अस्मितेचे प्रतीक नाही, तर इतिहासातील बऱ्याच घटनांचा तो साक्षीदारही आहे. लाल संगमरवरी दगडावरून लाल किल्ला नाव पडलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी बांधला असून, दिल्लीच्या ऐतिहासिक, जुन्या दिल्ली भागात लाल किल्ला, लाल वाळूचा खडकांनी बनलेला आहे. हा किल्ला पाचव्या मुघल बादशहा शाहजहांने बांधला होता.
मुख्य लक्ष्य लाल किल्ला सत्तेचे केंद्र
किल्ला तेव्हापासून सत्तेचे केंद्र म्हणून प्रस्थापित झाले, जेव्हापासून आक्रमकांनी दिल्लीसह उत्तर भारतात हल्ले केले. तेव्हा त्यांचे मुख्य लक्ष्य लाल किल्ला राहिले. १७३९ मध्ये इराणचा तार्किक शासक नादिरशाहचा हल्ला असो किंवा मराठा, शीख, जाट, गुज्जर यांचे आक्रमण असो, या सर्वांचे केंद्र लाल किल्लाच होता.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश
लाल किल्ला हा वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असल्याने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्याचा समावेश युनेस्कोने २००७ साली केला. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचे ध्वजारोहण करतात. याच लाल किल्ल्याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया.
लाल किल्ल्याचा इतिहास
मुघल बादशहा शाहजहाँनने लाल किल्ला बांधला. तत्कालिन काळात मोगलांची राजधानी आग्रा ही होती, पण शाहजहाँनने दिल्लीला आपली राजधानी बनवण्याचा निर्णय घेतला. आणि राजधानीला शोभेल अशा लाल किल्ल्याची उभारणी झाली. सन १६३८ मध्ये लाल किल्ल्याची पायाभरणी झाली. आणि सुमारे दहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर लाल किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले.भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार, लाल किल्ल्याचा बराचसा भाग हा पांढऱ्या रंगाचा होता, पण जेव्हा या पांढऱ्या भागाची चमक फिकट होऊ लागली, तेव्हा ब्रिटिशांनी त्यांच्या कारकिर्दीत लाल किल्ला लाल रंगाने रंगविण्याचा निर्णय घेतला. आणि किल्ल्याला सुरक्षा पुरविण्यासाठीची तटबंदी खूप उंच केली.
ख्याती शिगेला पोहोचली होती, तरी ३० वर्षे होता दुर्लक्षित
शाहजहाँन आणि औरंगजेब यांच्या कार्यकाळात लाल किल्ल्याची ख्याती शिगेला पोहोचली होती. परंतु जेव्हा मुघलांच्या कीर्तीचा अस्त व्हायला सुरवात झाली, तेव्हा लाल किल्ल्याचा दर्जाही कमी झाला. त्याला कारणही तसेच होते. लाल किल्ल्याच्या देखभालीसाठी बराच पैसा खर्च होत असे. याच कारणामुळे लाल किल्ला जवळपास ३० वर्षे दुर्लक्षित राहिला होता.सन १७३९मध्ये पर्शियन शासक नादिर शाहने मोगलांचा पराभव करून लाल किल्ला लुटला. त्यानंतरही, मोगल बादशहा लाल किल्ल्यातच राहिले, आणि लाल किल्ल्याचे वैभव जवळजवळ संपुष्टात आले होते. सुमारे २०० वर्षे लाल किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. त्यानंतर लाल किल्ल्यावर इंग्रजांनी राज्य केले.
हे वाचा : मंडल आयोगाची ३० वर्षं आणि ओबीसींची दशा आणि दिशा
१८५७च्या उठावात लाल किल्ल्याची महत्त्वपूर्ण भूमिका
भारताच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सन १८५७ च्या उठावात लाल किल्ल्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. इंग्रजांविरुद्ध बंडाची ठिणगी टाकण्यात लाल किल्ल्याचा मोठा वाटा आहे. मुघल बादशहा बहादूर शाह जफरच्या नेतृत्वात लाल किल्ला राजकारणाचे केंद्र बनले. पण हे बंड अयशस्वी होताच इंग्रजांनी शेवटचा मुघल सम्राट बहादूरशाह जफरला ताब्यात घेऊन त्याची रंगून येथे रवानगी केली आणि लाल किल्ला पूर्णपणे इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. जेव्हा ब्रिटिशांनी भारतातून आपले बस्तान गुंडाळले तेव्हा कोहिनूर हिऱ्यासह लाल किल्ल्यातील अनेक मौल्यवान वस्तूंचा खजिनाही सोबत नेला. विशेष म्हणजे किल्ल्याचं फर्निचरदेखील इंग्रज त्यांच्या बरोबर घेऊन गेले होते.
स्वातंत्र्यलढ्याचे केंद्र
१८व्या शतकातील ही स्थिती १९व्या शतकातही कायम राहिली आणि १८५७ पूर्वीच्या स्वातंत्र्यलढ्याचे केंद्र एक प्रकारे लाल किल्लाच होता. त्यानंतर क्रांतिकारकांचे नेतृत्व करणारा शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याला इंग्रजांनी अटक करून म्यानमारला पाठवले. एवढेच नाही तर इंग्रजांनी लाल किल्ल्याचेही प्रचंड नुकसान केले.
सुभाषचंद्र बोस यांनी 'दिल्ली चलो'चा नारा दिला होता.
१९४० च्या दशकात लाल किल्ल्याचे महत्त्व पुन्हा एकदा दिसून आले, जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बहादूरशहा जफरच्या समाधीवर श्रद्धांजली वाहण्यासाठी रंगूनला भेट दिली आणि दिल्ली चलोचा नारा दिला. 'दिल्ली चलो'चा नारा देशाच्या राजधानीत जाऊन आपली ताकद दाखवण्याचे प्रतीक होते. आता दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर त्याचे केंद्रही लाल किल्लाच होता.
.. म्हणून लाल किल्ल्यावरच तिरंगा फडकवला जातो
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल किल्ल्यावरील ब्रिटीश ध्वज उतरवून त्याठिकाणी तिरंगा फडकविण्यात आला. राजकारणात प्रतीकांना खूप महत्त्व असते. यामुळेच देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. आणि पुन्हा एकदा सत्तेचे केंद्र म्हणून लाल किल्ल्याला महत्त्व प्राप्त झाले. तेव्हापासून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशाला संबोधित करतात. त्या काळी लाल किल्ल्या व्यतिरिक्त अशी कोणतीही महत्त्वाची इतर बिगर वसाहती इमारत नव्हती त्यामुळेच लाल किल्ल्याला महत्व प्राप्त झाले, असे दिसून येतो आहे.
Comments