मेळघाटात घडत आहेत एकलव्य

एकलव्य फाउंडेशनच्या मदतीने


    मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला, सर्विकडे डोंगराळ हिरवेगार, जैवविविधतेने नटून थटून, आदिवासी बहुल समाज जीवन व आदिवासी संस्कृती असलेला, अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुका म्हणजेच मेळघाट. हा भाग बालमृत्यू, कुपोषणसाठी तर प्रसिद्ध आहेच सोबतच शैक्षणिक कुपोषण ही तितकाच आहे? असे म्हणता येईल. येथे मोठ्या प्रमाणात कोरकू व इतर आदिवासी समाज आहे. हा समाज अतिशय दुर्गम व जंगल भागात राहत असून या समाजातील आजही युवक युवती शिक्षणापासून वंचित आहेत. याकरिता एकलव्य फाउंडेशन गेल्या ४ वर्षांपासून येथील विद्यार्थ्यांना १२वी पुढील उच्च शिक्षण काय? व यातील नोकरीच्या संधी संबंधाने वेगवेगळे उपक्रम राबवत असते.

एकही पदवीधर विद्यार्थी भेटायचा नाही, म्हणून एकलव्य पुढे आले..

१० वर्षा आधी याभागात काम करत असताना एकलव्यचे संस्थापक राजू केंद्रे यांना इथे एकही पदवीधर विद्यार्थी भेटायचा नाही. एवढ्या चांगल्या क्षमता असणाऱ्या भागात एकही पदवीधर मुलगा नाही. प्राथमिक व उच्च शिक्षणात खूप मोठी दरी आहे. ती दरी भरून काढण्यासाठी, लोकल लिडरशीप उभी राहिली पाहिजे या मताला घेऊन, उच्च शिक्षण विकासाचे महत्वाचे माध्यम आहे. त्यामुळे कोरकू आदिवासी विद्यार्थ्यांना पुढे नेणे महत्वाचे आहे.

आपल्या क्षेत्राचा तसेच कुटुंबाचा विकास करावा हे उद्दिष्ट

येथील विद्यार्थी हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, आपल्या क्षेत्राचा तसेच कुटुंबाचा विकास करावा हे उद्दिष्ट ठेवून, एकलव्य फाउंडेशन मेळघाट भागातील पहिल्या पिढीतील विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणासाठी देशातील नामांकित विद्यापीठात पाठवण्यासाठी काम करत आहे. यासाठी जनजागृती, क्षमता बांधणी आणि मार्गदर्शन करत असून यात विद्यार्थ्यांना कृषी, पर्यावरण, वन व्यवस्थापन, पत्रकारिता व त्यातील संधी, शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन, सामाजिक शिक्षणातील शिक्षणाच्या संधी तसेच पुणे येथील शैक्षणिक संस्था व वसतिगृह इत्यादींकरिता मार्गदर्शन एकलव्यच्या माध्यमातून केले जाते.

एकलव्यच्या प्रयत्नातून मेळघाटातील राष्ट्रीय शैक्षणिक संस्था व विद्यापीठात

एकलव्यच्या या प्रयत्नातून मेळघाटातील २५ कोरकु विद्यार्थी उच्च शिक्षणात टिकवून ठेवले आणि त्यातील ३ विद्यार्थी यावर्षी पदवी पूर्ण करत आहेत. पदव्युत्तर शिक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई आणि अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी बंगलोर येथील प्रवेश परीक्षा पास झालेले आहेत. ते मेळघाट मधून अशा राष्ट्रीय विद्यापीठांमध्ये जाणारे पहिलेच कोरकु विद्यार्थी असतील. 

चिलाटी येथे तीन दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे निवासी आयोजन

मेळघाटात २८ ते ३० एप्रिल चिलाटी येथे तीन दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे निवासी आयोजन एकलव्य फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यशाळेत चिलाटी हातरु भागातील १२वीचे ८० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना १२वी पुढील उच्च शिक्षण काय? व यातील नोकरीच्या संधी संबंधाने वेगवेगळे तसेच मेळघाट येथून एकलव्यच्या माध्यमातून बाहेर शिक्षणाकरिता गेलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

चिलाटी हे ठिकाणी चिखलदरा तालुक्यातील वरच्या भागाला मध्यप्रदेश सीमेलगत आहे. चिलाटी हे मेळघाटच्या कोर जंगल भागात असल्याने, इथे नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. गावात जवळजवळ १० घरे पक्के असून, बाकी पूर्ण घरे कच्चे म्हणजेच मातीच्या भिंती असलेल्या व कवेलू छत आहेत. यागावात कोणतेही शासकीय, खाजगी वाहने जात नसल्याने तेथील लोकांना व विद्यार्थ्यांना स्वतःच्या साधनानेच प्रवास करावा लागतो. शिक्षणासाठी बाहेर जायचं म्हटलं तर त्यांना प्रवासाच्या साधनांचीच मोठी अडचण आहे. गावात नेटवर्क नसल्याने तसेच कोणतेही वाहन गावात येत नसल्याने वर्तमानपत्र येथील नागरीकांच्या विद्यार्थ्यांच्या हाती पडत नाही. 

विद्यार्थ्यांनी तालुक्याचा ठिकाणीच बघितला नाही

जेव्हा कार्यशाळेतीली उपस्थित विद्यार्थ्यांना प्रश्न उपस्थित केला की, तुमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (कलेक्टर) कोण? तर एकानेही उत्तर दिले नाही. पालकमंत्री कोण? यावर सुद्धा उत्तर मिळाले नाही. तुमच्यापैकी कोण तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आलेत? हा प्रश्न विचारला, तेव्हा अक्षरशः ८० पैकी फक्त २ विद्यार्थ्यांनी हात वरती केला होता. पण त्यांना म्हटलं तहसीलदाराचे नाव काय? तर कुणीही उत्तर देऊ शकले नाही. इतकी भयानक परिस्थिती या भागातील विद्यार्थ्यांची आहे.

नो नेटवर्क

जेव्हा आम्हाला महत्वाचे फोन करायचे असले तर गावापासून दूर १ किमी अंतरावरील एका टेकडीवर येऊन तिथे नेटवर्क शोधावा लागत असे. नेटवर्क मिळाले तर तेही एक दोन दांडी म्हणजे बोलणं सुद्धा अडखळत होत असल्याने संवाद सुद्धा व्यवस्थित नाही. त्यावेळी एक प्रश्न मनात उपस्थित झाला की, या भागातील विद्यार्थी घडणार तरी कसे? इथे सामान्य सोयी सुविधा उपलब्ध नाहीत? मात्र विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची तळमळ या कार्यशाळेत दिसून येत होती. 

कौशल्य,  सर्जनशीलता असून ही विद्यार्थी मागे का?

या कार्यशाळेत आलेल्या अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर असे लक्षात आले की, अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जिद्द आहे, त्यांचे  वेगवेगळे स्वप्न, त्यांचामध्ये असलेले विविध कौशल्य यासोबतच समाजातील  शैक्षणिक, सामाजिक समस्या, आर्थिक परिस्थितींमुळे विद्यार्थ्यांमध्ये  कौशल्य,  सर्जनशीलता असतांना सुद्धा ही ते मागे का राहुन जातात? तसेच अनेक विद्यार्थ्यांना पुढे शिक्षण घेण्यासाठी बाहेर जायचे आहे. परंतु अडचणींमुळे ते बाहेर शिक्षणासाठी पडत नाहीत. अशी खंत ही यावेळी त्यांनी वक्त केली.

शैक्षणिक कुपोषण ही तितकाच आहे?

मेळघाट म्हणजे फक्त बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न, असा लोकांचा समज झाला आहे. मात्र, तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे, तो शैक्षणिक कुपोषणाचाही. शिक्षणातून ज्या क्षमता विकसित व्हायला हव्यात त्या होत नाहीत. मुलं शाळेत जात नाहीत, गेली तर टिकत नाहीत आणि टिकली तर शिकत नाहीत. आश्रमशाळांमध्ये सुविधा नाहीत. विज्ञान गणितासारख्या विषयांचे शिक्षक नाहीत. शाळेत प्रयोगशाळा नाहीत. मुलं पुढं ढकलली जात आहेत. अमरावतीसारख्या शहरात सायन्स शाखेला गेलेली मुलं दोन महिनेही टिकत नाहीत; कारण त्या अभ्यासक्रमाची तयारी नसल्यानं तो पेलत नाही. शिक्षणात गुणवत्ता निर्माण करणं हेच आजचं सर्वात मोठं आव्हान या भागातील आहे.

शिक्षणाच्या अभावामुळे

येथील लोकसंख्या बहुतांशी अशिक्षित आणि अनभिज्ञ आहे. राहणीमान खालावलेले असून बेरोजगारी आहे. त्यामुळे अनेक जण गाव सोडून उदरनिर्वाहासाठी बाहेर पडतात. त्यामुळे मुलांची आणि त्यांच्या मातांची योग्य काळजी घेतली जात नाही. मागासलेपणाचा परिणाम म्हणून येथेही काय होत आहे ते म्हणजे लवकर लग्ने होतात. लहान वयातच लग्न झाले तर स्त्रिया मातृत्वासाठी पूर्ण विकसित होत नाहीत. परिणामी त्यांच्या पोटी जन्मलेली मुले कमी वजनाने जन्माला येतात.

येथे आहेत अनेक आव्हाने...

मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न, तसेच आरोग्यविषयक आव्हाने, हे एक अतिशय विलक्षण वैशिष्ट्य आहे ज्यामध्ये केवळ आव्हानात्मक भूभागच नाही तर त्या भागातील सांस्कृतिक समस्यांचाही समावेश आहे. गेल्या दोन दशकांत अनेक हस्तक्षेप केले गेले आहेत.परंतु अजूनही काही ही सुधारणा झालेली नाही. अंधश्रद्धा देखील त्यांना वैद्यकीय सेवेपासून दूर ठेवते आणि लोक अजूनही त्यांच्या विश्वासामुळे भुमकाकडे जाणे पसंत करतात.


कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर घेतलेला फोटो 


Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?