मेळघाट येथे शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा

एकलव्य फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

कल्याणी राठोड/ राम वाडीभष्मे: मेळघाट येथील कोरकू व इतर आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना १२वी पुढील उच्च शिक्षण काय? व यातील नोकरीच्या संधी संबंधाने चिलाटी येथे तीन दिवसीय शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळेचे निवासी आयोजन एकलव्य फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले. 

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कृषी, पर्यावरण, वन व्यवस्थापन, पत्रकारिता व त्यातील संधी, शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन, सामाजिक शिक्षणातील शिक्षणाच्या संधी तसेच पुणे येथील शैक्षणिक संस्था व वसतिगृह, मेळघाट येथून एकलव्यच्या माध्यमातून बाहेर शिक्षणाकरिता गेलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

या कार्यशाळेत चिलाटी हातरु भागातील १२वीचे ८० विद्यार्थी उपस्थित होते. चिलाटी हे ठिकाणी चिखलदरा तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगत आहे. येथे मोठ्या प्रमाणात कोरकू समाज आहे. आपल्या क्षेत्राचा तसेच कुटुंबाचा विकास करावा हे उद्दिष्ट ठेवून, एकलव्य फाउंडेशन मेळघाट भागात गेल्या ४ वर्षांपासून पहिल्या पिढीतील विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणासाठी देशातील नामांकित विद्यापीठात पाठवण्यासाठी काम करत आहे. यासाठी जनजागृती, क्षमता बांधणी आणि मार्गदर्शन करत आहे. 

या प्रयत्नातून २५ कोरकु विद्यार्थी उच्च शिक्षणात टिकवून ठेवले आणि त्यातील ३ विद्यार्थी यावर्षी पदवी पूर्ण करत आहेत. पदव्युत्तर शिक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई आणि अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी बंगलोर येथील प्रवेश परीक्षा पास झालेले आहेत. ते मेळघाट मधून अशा राष्ट्रीय विद्यापीठांमध्ये जाणारे पहिलेच कोरकु विद्यार्थी असतील. 

या कार्यशाळेचे समन्वयन एकलव्य चे प्रकाश शेंडे यांनी केले तर यासाठी गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना कळविण्याचे काम रमेश मावस्कार यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. सुभाष कासडेकर, सुधीर मावसकर, जमुना बेठेकर, उर्मिला कासडेकर, अनिता कासडेकर, मुकेश सकोम, रंजिता भुसुम, पवन ठाकरे आणि गजानन दरसिमबे यांनी केले. या कार्यशाळेसाठी मेळघाट मित्र आणि मैत्री या संस्थेचे सहकार्य लाभले.

कार्यशाळा आयोजनात अतुल पाटील, पायल झाडे, सायली शेळके डॉ. नितीन धुर्वे, राम फड, रमेश मावस्कर, अनघा दरने इत्यादी यांनी सहकार्य केले. 

कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून धनंजय सायरे, विशान देवडा, अविनाश मडावी, स्वामी, राम फड, डॉ. नितीन धुर्वे व राम वाडीभष्मे होते.

एकलव्य बद्दल थोडक्यात

आदिवासी, ग्रामीण भागातील पहिल्या पिढीतील शिकणारे आणि प्रादेशिक भाषा माध्यमातुन शिक्षण घेतलेल्या, वंचित समाजातील तरुणांचे नेतृत्व व्हावे याकरिता विद्यार्थ्यांना  एकलव्यच्या माध्यमातुन टाटा इन्स्टिटयूट, आयआयटी, केंद्रीय विद्यापीठ सारख्या भारतातील नामांकित संस्थां व फेलोशिप, मध्ये पोहचविण्याचे कार्य होत आहे. याकरिता तीन महिन्याचा क्रश कोर्स चालविण्यात येत आहे. गेल्या चार वर्षात एकलव्य ने नामांकित उच्च शिक्षण संस्था आणि फेलोशिप प्रोग्राममध्ये ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना  अभ्यासासाठी पाठविण्यात यश मिळविले आहे. 

१० वर्षाआधी याभागात काम करत असताना इथे एकही पदवीधर विद्यार्थी भेटायचा नाही याची खंत होती. एवढ्या चांगल्या क्षमता असणाऱ्या भागात एकही पदवीधर मुलगा नाही. प्राथमिक व उच्च शिक्षणात खूप मोठी दरी आहे. ती दरी भरून काढण्यासाठी एकलव्यच्या माध्यमातून गेल्या ४वर्षापासून लोकल लिडरशीप उभी राहिली पाहिजे या मताला घेऊन एकलव्य काम करतो आहे. उच्च शिक्षण विकासाचे महत्वाचे माध्यम आहे. त्यामुळे कोरकू आदिवासी विद्यार्थ्यांना पुढे नेणे महत्वाचे आहे.

राजू केंद्रे, संस्थापक एकलव्य फाऊंडेशन

मेळघाट सारख्या अति दुर्गम आदिवासी भागातून १२ वी नंतरच्या शिक्षणासाठी जास्त मुले बाहेर पडत नाहीत, बाहेर ते शिक्षणासाठी गेले, तरी परतवाडा, अमरावती येथील महाविद्यालयातील पारंपारिक कोर्स च्या पलिकडे जात नाहीत. त्यातही हॉस्टेल, स्कॉलरशिप न मिळाल्याच्या अडचणीमुळे, घरच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे इतर सामाजिक, शैक्षणिक कारणामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागते. अशा भागात जनजागृती करून ८० विद्यार्थी रस्ते आणि वाहनांच्या अडचणी दूर सारून कार्यशाळेला येतात आणि उच्च शिक्षण पुणे येथे नामवंत महाविद्यालये आणि इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय विद्यापीठात शिकण्याची इच्छा बाळगतात, हे या कार्यशाळेचा फलित म्हणता येईल.

प्रकाश शेंडे, कार्यशाळा समन्वय एकलव्य टीम

यवतमाळ एकलव्यमध्ये शिकणाऱ्या ताई दादा कडून १२ वीच्या कार्यशाळे बद्दल माहिती मिळाली. त्या कार्यशाळेमध्ये जाण्यासाठी आमच्याकडे गाडी नव्हती. त्यामुळे ५ किमी पायी प्रवास केला. या कार्यशाळेत आम्हाला वेगवेगळ्या कोर्स आणि कॉलेज बद्दल माहिती मिळाली. तसेच उच्च शिक्षण चांगल्या कॉलेज विद्यापीठातून घेतले पाहिजे याची माहिती मिळाली.

निता धिकार, सिमोरी त. चिखलदरा जि. अमरावती

Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?