आदिवासी महिलांमध्ये नेतृत्व गुण विकसित करणार ; शुभदा देशमुख

जागतिक महिला दिनानिमित्ताने विशेष मुलाखत

अवंती भोयर/ राम वाडीभष्मे

फोटो शुभदा देशमुख यांच्या एफबीवरुन सादर 

गडचिरोली जिल्हा अतिशय दुर्गम व मागासलेला असून येथील मोठ्या प्रमाणात असलेला आदिवासी समाज हा सामान्य समाज जीवनाप्रमाणेच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख हे ध्येयवादी दाम्पत्य गेल्या ३५ वर्षांपासून करत आहेत. रोजगारापासून ते आरोग्यापर्यंतच्या आदिवासींच्या सर्वच प्रश्नांना हे दाम्पत्य भिडत असून कुरखेडा (जि. गडचिरोली) येथे मुख्यालय असलेल्या ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी`ही संस्था १९८४ मध्ये स्थापन करून तेव्हापासून शेती, आरोग्य, अपंग आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेत आहे. आदिवासींच्या सक्षमीकरणाचा वसा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी घेतला आहे. 

महाविद्यालयीन काळात इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सतीश आणि शुभदा हे सुध्दा जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने भारावून गेले होते. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखालील आंदोलनात तरुणाई मोठय़ा संख्येने सहभागी झाली. मात्र, आंदोलन विघटित होत गेले आणि त्यात सहभागी झालेल्यांनी नव्या दिशा शोधण्यास सुरुवात केली. डॉ. सतीश गोगुलवार यांनी त्यांचे कार्यक्षेत्र म्हणून गडचिरोली जिल्ह्याची निवड केली आणि शुभदा देशमुख यांनी त्यांना सहकार्याचा हात दिला. त्यातून ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था जन्माला आली. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभदा देशमुख यांच्याशी साधलेला हा संवाद प्रेरणादायी ठरावा. 

शुभदा देशमुख आणि डॉ. सतीश गोगुलवार 

ज्या काळात आपण काम करायला सुरुवात केली त्या काळी गडचिरोली हा भाग अतिशय दुर्गम आणि नक्षलवादी भाग होता तेव्हा एक महिला म्हणून आपण आपल्या कामाला कशी सुरुवात केली? व त्यावेळी आपल्याला आलेल्या अडचणींविषयी काय सांगाल.

संस्थेची सुरुवात आम्ही १९८४ मध्ये केली. त्यापूर्वीचे एक वर्ष आम्ही दोघांनी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे बांधकाम लाकूड कामगार संघटना या रोजगार हमी मजूर संघटनेसोबत दोघांनी घालवले. या एक वर्षात संघटनेचे काम काय आहे, कसे आहे, आपल्याला काय करता येईल हे आम्ही शिकलो. गडचिरोली हा नवीन जिल्हा होता त्यावेळी सध्याचा कुरखेडा आणि कोर्ची हे दोन मिळून एकच तालुका होता. त्या काळात इलेक्ट्रीसीटी नसणे, दळणवळणाच्या सोईसुविधा कमी असणे इत्यादी समस्या तसेच फक्त सरकारी दवाखाना होता, खासगी दवाखाने फार कमी होते, महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी असून त्यावेळी जेमतेम शिक्षणाची सुरुवात झालेली होती. या सगळ्यांमध्ये बदल करत असताना अडचणी फार आल्या, आजही आहेत परंतु आज त्या तुलनेने कमी आहेत.

आरोग्य आणि महिला सशक्तीकरणाबाबत कुठल्या कार्यक्रमांचे आयोजन आपण करत असता?

 सर्वप्रथम कुठल्याही गोष्टीची माहिती देणे हा उपक्रम आम्ही हाती घेतला. सर्वसाधारण आजार तसेच स्त्रियांबद्दलचे आजार विशेषतः महिलांमधील अशक्तपणा दूर करण्यासाठी घेण्यात येणारा आहार, औषधे याबद्दलची माहिती देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले. त्यानंतर मासिक पाळी बद्दलची माहिती, त्याबद्दल असणारे गैरसमज त्याचबरोबर त्याविषयीची काळजी यावर महिलांसोबत काम केले. सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने गावागावात असलेल्या महिला मंडळांना एकत्रित आणून हे कार्य आम्ही केलं. एका महिला मंडळाच्या अध्यक्ष असलेल्या महिलेने मांडणी केली की जर दारूबंदी केली तर आमचं अर्ध युद्ध बंद होईल. याबाबत शासनाला मागणी करण्याचे कामही आम्ही केले. इतर काही स्वयंसेवी संस्थांना जोडून गडचिरोलीचे लोकआंदोलन व दारूमुक्ती आंदोलन डॉ. अभय बंग, राणी बंग, मोहन हिराभाई हिरालाल तसेच इतर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही उभे केले. साधारणतः १९८९ ते १९९३ पर्यंत हा लढा शासनाशी सुरू राहीला. संपूर्ण जिल्ह्यातील साडेतीनशे महिला मंडळे आणि युवक मंडळे या लढ्यासाठी उभे झालेले होते. त्यानंतर वारंवार येणारे छोटेमोठे आजार यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करत असताना गावातील काही वैद्यांना जोडून काही व्यवस्था करणे तसेच काही कमी शिकलेल्या परंतु आवड असणाऱ्या महिलांना ट्रेनिंग देऊन गावामध्ये औषधे उपलब्ध करून देणे ही सगळी कामे आम्ही केलेली आहेत.

नुकतीच किराण्याच्या दुकानामध्ये वाईन विकली जाणार असल्याची घोषणा राज्यशासनाने केली तर याबद्दल आपण काही भूमिका घेणार आहात काय? 

किराणा दुकानात दारू उपलब्ध होणार असल्याची घोषणा जेव्हा शासनाने केली तेव्हा आम्ही तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर यासाठीचे पत्र शासनाला दिले आहे. तसेच असं काहीही घडलं तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा आम्ही शासनाला दिला. यासाठी महिला मंडळ तयार आहेत आणि गरज पडल्यास निश्चितच हा लढा आम्ही उभा करू. 

समाज आजच्या एवढा पुढारलेला नसताना आपण अनेक धाडसी पाऊलं उचललीत त्यातलेच एक म्हणजे आपला आंतरजातीय विवाह. त्यावेळी आपल्याला करावा लागलेला संघर्ष आणि आणि आलेले अडथळे या सर्वांना आपण कसे तोंड दिले? 

 'छात्र युवा संघर्ष वाहिनी' या संघटनेमध्ये आम्ही दोघे असताना तिथे हा विचार केला की आपल्याला 'जात' हा भाग ठेवायचा नाही. हा भाग न ठेवण्यासाठी काय काय गोष्टी केल्या जातील हा विचार केला असता असे लक्षात आले की मुलामुलींनी आंतरजातीय विवाह केला तर हे शक्य होऊ शकते. ज्यावेळी लग्न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि घरी सांगितलं तेव्हा आईने विचारलं की कोणत्या जातीचा मुलगा आहे तेव्हा मी म्हटलं की मला माहिती नाही. घरचा विरोध कमी असला तरी ज्याला काहीही देणंघेणं नाही असा जो समाज आहे त्यांचे म्हणणे, त्यांचे टोमणे या सगळ्याला घरच्यांना तोंड द्यावे लागते. परंतु माझ्या आईने हे सगळं सहन केलं आणि ती आमच्या पाठीशी उभी राहिली. 

सहायक ट्रस्ट मुबंई तर्फे महिलांमधील हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यासाठी आपण काही कार्यक्रमांचे आयोजन केले, त्याबद्दल विस्तृत माहिती सांगाल काय?

महिलांमधील अशक्तपणा व त्यावरील उपाय याबद्दल माहिती देण्याचे कार्य आम्ही केले. सहायक ट्रस्ट सोबत काम करत असताना एक रिसर्च प्रोजेक्ट तयार झाला. या प्रोजेक्ट मध्ये वेगवेगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या. त्यात हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काही स्थानिक गोष्टी जसे अंबाडीचा उपयोग केल्या गेला. त्याचप्रमाणे परसबाग नसल्यामुळे वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्या जात नसून पुरेसे जीवनसत्व मिळत नाही या सर्व गोष्टींचा अभ्यास सहायक ट्रस्ट सोबत झाला. त्यांनतर काही ठिकाणी परसबाग आणि हिमोग्लोबिन तपासणी हा प्रयोगदेखील केल्या गेला. 

गडचिरोली जिल्ह्यात आजही गोंडी भाषिक लोकं आहेत आणि या भागात बोलीभाषेतील शिक्षण मिळावं या दृष्टीने आपण काय उपाययोजना केल्या आहेत?

कोर्ची या भागामध्ये आम्ही एक प्रयोग केला होता. या भागात गोंडी आणि छत्तीसगडी या दोन भाषा बोलल्या जातात आणि मराठीमधून  शिकवल्या जाते. यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की पहिल्यांदा मुलांना कन्सेप्ट क्लीअर होण्यासाठी त्यांची भाषा आवश्यक आहे. आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेने यासाठीचे जे प्रयोग केले त्यात गावामध्ये जीवनशाळा चालविणे सुरू केले. या जीवनशाळेमध्ये गावतलेच मुलंमुली शिकवायला तयार होते. त्यानंतर शाळेमध्ये आताच्या अभ्यासक्रमामध्ये मुलांना जीवनासाठी लागणारे शिक्षण हे मोठ्या प्रमाणात नाही, तर ते देण्यासाठीचा प्रयत्न कसा करता येईल यावर आम्ही विचार करत आहोत. 

महिला बचत गटांपासून सुरू झालेली ही प्रक्रिया आज जिल्हा संघटनांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे तर आपला हा प्रवास कसा राहिला?

या भागात बचत गटांची गरज काय आहे यावर जेव्हा कार्य करत राहिलो तेव्हा असे समोर आले की इथे काही वेळेला आंध्रप्रदेशमधून काही लोकं येतात आणि ते शेतीच्या कामाची सुरुवात होत असताना व्याजाने काही पैसे देत असतात. हे पैसे १२५% व्याजदराने दिले जातात आणि ही खूप मोठी लूट होती. त्यानंतर  सर्वसामान्य शेतकरी, महिला यांना बँकेत उभेच केले जात नव्हते कारण त्या जमिनीच्या मालक नसायच्या. त्यामुळे या महिलांना आत्मसन्मानाने उभे करण्यासाठी या स्वयंसहाय्यता बचत गटाची गरज लक्षात आली. त्यांनतर जवळपास प्रत्येक गावात एक गट निर्माण झाला आणि पुढे गावाच्या संख्येनुसार दोन किंवा तीन गट पुढे येऊ लागले. परंतु नंतर प्रत्येक गटाला वेगवेगळे जाऊन सांगणे शक्य होत नव्हते. त्यामुळे बचत गटांची संघटन बांधणी केली. संघटनेशिवाय आपले प्रश्न सोडवले जाणार नाहीत असा आमचा ठाम विश्वास होता. पैशांचं संघटन न करता महिलांचं संघटन आम्हाला हवं होतं. त्यामुळे महिला जेव्हा बँकेमध्ये खाते उघडायला लागल्या आणि आपसात कर्जव्यवहार करून वेळच्यावेळी हे कर्ज परत करायला लागल्या या गोष्टी जेव्हा बँकांना पटल्या तेव्हा बँकांनी कर्ज द्यायला सुरुवात केली. यामध्ये बहुतांश महिला या अशिक्षित होत्या परंतू त्यांच्यासोबत राहून मला हे कळलं की पाच हजार रुपयांचा हिशेब न शिकलेली बाई तोंडी ठेवू शकते. यातूनच आम्हाला अनेक महिला मिळत गेल्या आणि महिला संघटन म्हणून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा उभा झाला. 

यावर्षीच्या महिला आणि आरोग्यविषयी केंद्र शासनाच्या बजेट संदर्भात आपले काय मत आहे?

आम्ही आता नुकतंच महिला किसान अधिकार मंचतर्फे महाराष्ट्र पातळीवर राज्याचे जे बजेट आहे ते महिला केंद्रित असेल असा प्रयत्न करत आहोत. याची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केलेली आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु अजूनपर्यंत प्रत्येक विभागाचे जेंडर स्केल असायला पाहिजे, कारण आज महिला या सगळ्याच क्षेत्रामध्ये पुढे आहेत. ही कल्पना फक्त राज्यस्तरावर राहून चालणार नाही तर ती जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतपर्यंत आली पाहिजे. १५ ते ४९ या वयातल्या महिलांचाच विचार आरोग्य व्यवस्था साधारणपणे करत असते. परंतु जी बाई मुलं जन्माला घालते त्याच वयोगटातील महिलांचा विचार करून चालणार नाही तर सगळ्याच महिलांच्या आरोग्याचा विचार व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांच्या मानसिक आरोग्याचा विचारही व्हायला हवा. शेती आणि पशुपालन या भागात महिला मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचप्रमाणे तलावातील, नदीतील मासेमारी करण्याऱ्या महिलांसाठी काही विशेष व्यवस्था असणे आवश्यक आहे. 

छात्र युवा संघर्ष वाहिनी यामध्ये कार्यरत असताना आपणही राजकीय क्षेत्रात पाऊल टाकून काहीतरी सुधारणा कराव्या असे आपल्याला वाटले नाही का?

छात्र युवा वाहिनी कधीही पक्षीय राजकारणात उतरली नाही तिथे लोकांचं राजकारण होतं. त्यावेळी आपण राजकारणात जावं असं कधीही वाटलं नाही. परंतु गडचिरोली मध्ये काम करत असताना लोकांना हेच वाटायचं की यांना निवडणूका लढवायच्या असल्यामुळे हे लोकं इथे काम करत आहेत. परंतु आम्ही ठरवलं होतं की आपण लोकांचे राजकारण करू पण निवडणूकीचे राजकारण करायचे नाही. निवडणुकीच्या राजकारणात पडल्यानंतर माणसं विभागली जातात आणि हे आम्हाला करायचं नव्हतं. आणि धोरणांना प्रभावित करायचं असेल तर महिला संगठण करायचं त्यासाठी पक्षीय राजकारण करण्याची गरज कधीच वाटली नाही. 

सध्या ग्रामीण आणि आदिवासी महिलांची स्थिती कशी आहे आणि भविष्यात आणखी काय काम करण्याचा आपला मानस आहे?

आज शिक्षणात बऱ्याच मुली येत आहेत. आज त्यांचे विचार समजून घेणे आवश्यक आहे. काही वर्ष आम्ही मोठ्या प्रमाणात किशोरी प्रशिक्षण घेतले आणि आजही गरज पडल्यास घेत आहोत. परंतु आता नवीन पद्धतीने, जसे कॉम्प्युटर द्वारे हे प्रशिक्षण व्हावं ही आम्हाला आशा आहे. आश्रमशाळांसोबत जोडून आम्ही काही गोष्टी करत आहोत. त्याचप्रमाणे या मुलींना मोठ्या प्रमाणात खेळांची आवड आहे. त्यासाठी कशा पद्धतीने त्यांना सहाय्य करता येईल याकडे आमचे लक्ष आहे. तसेच आर्थिक स्वातंत्र्याकरीता बचतगटाच्या पलीकडे जाऊन त्या विचार करण्याकरिता कशा तयार होतील, महिला लिडरशीप कशी तयार होईल आणि वेगवेगळे कायदे राबवून घेण्यासाठी महिला कशा तयार होतील यासाठीच आमचे पुढील कार्य सुरू राहील.

Comments

Popular posts from this blog

सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध करण्याइतपत संघर्ष करावा -शरद बाविस्कर

मेळघाटात घडत आहेत एकलव्य

विश्लेषण : ‘एक देश एक खत’ धोरण म्हणजे काय?